Friday, October 7, 2016

कांदाचाळ निर्मितीसाठी कालबद्ध कार्यक्रम राबविणार कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत



पंढरपूर, दि.7: राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून कांदा चाळ निर्मितीसाठी राज्यात कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत राज्यात पाच वर्षात 15 लाख कांदा चाळ निर्माण करण्याचा मानस असल्याचे मत कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पंढरपूर येथे कृषि विभागाच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत व्यक्त केले.
            येथील शासकीय विश्रामगृह येथे कृषि विभागाच्या आढावा बैठकीप्रसंगी कृषि राज्यमंत्री श्री. खोत बोलत होते. बैठकीस आमदार प्रशांत परिचारक, तहसिलदार नागेश पाटील, पुणे विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक विजयकुमार इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बसवराज बिराजदार यांच्यासह कृषि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
            कृषि राज्यमंत्री म्हणाले श्री. खोत म्हणाले, केंद्र व राज्य शासनामार्फत कृषि विकासाच्या अनेक योजना राबविल्या जातात. या योजनांची माहिती शेतकऱ्यांना व्हावी  यासाठी सर्कल पातळीवर शेतकरी मेळावे आयोजित करण्यात यावेत. या मेळाव्यातून कृषि योजनांची माहिती दिल्यास याचा प्रत्यक्ष लाभ लाभार्थीस होण्यास मदत होईल.  गाव पातळीवर कृषि हक्क समिती स्थापन करण्यात येणार असून या समितीमार्फत ग्रामसभेतून कृषि योजनांचे लाभार्थी निवडण्याचे काम होईल आणि शेतकऱ्यांना कृषि योजनांची माहितीही होणार आहे. ज्या गावात, सर्कलमध्ये  अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले आहे त्याची यादी तयार करुन त्या शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत मिळवून द्यावी अशा सूचनाही श्री. खोत यांनी  कृषि अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या.
            कृषि राज्यमंत्री म्हणाले, शेती सुधारणा, पीक व्यवस्थापन यासाठी  दीर्घकालीन उपाय योजना आखण्यावर राज्य शासनाचा भर आहे, यासाठी शेतीत मोठी गुंतवणूक होणे अपेक्षित आहे.  जलयुक्त शिवार अभियानात राज्यात मोठ्या प्रमाणावर शाश्वत पाणी साठे झाले आहेत. शेतकऱ्यांनी पाणी आणि पिकाचे व्यवस्थापन करुन शेती ठिबक सिंचनाद्वारे करण्यास प्राधान्य द्यावे.  नाबार्डच्या सहकार्यातून राज्यात 3 लाख हेक्टर क्षेत्रावर ठिबक सिंचन योजना राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  बेदाण्याला आंतरराष्ट्रीय बाजरपेठ मिळवून देण्यासाठी पणन अंतर्गत एक समिती नेमण्याचे प्रस्तावित असल्यचेही ते म्हणाले.
            ज्या शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचे अनुदान मिळाले नाही त्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहेत. निधी प्राप्त होताच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान वर्ग केले आहे.  सोलापूर जिल्ह्यात ठिबकसाठी पूर्व संमतली दिलेल्या शेतकऱ्यांना सुमारे 185 कोटीचे अनुदान देय असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले. मातीचे आरोग्य तपासण्यासाठी मुद्रा आरोग्य कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना करुन कृषि राज्यमंत्री यांनी या बैठकीत दिल्या.
            या बैठकीत कृषि विभागाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, कृषि यांत्रिकीकरण, मागेल त्याला शेततळे, राष्ट्रीय फलोत्पादन योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, सामुहिक शेततळी, शेडनेट होऊस, कोरडवाहू शेती अभियान, हायड्रोपोनिक्स चारा निमिर्ती, मृदा आरोग्य, राष्‍ट्रीय सुक्ष्म सिंचन, राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, जलयुक्त शिवार अभियान, फळबाग लागवड कार्यक्रम या योजनांना आढावा घेण्यात आला.
                                                   00000

No comments:

Post a Comment