Friday, October 28, 2016

वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे जिल्हाधिकारी सौरभ राव


पुणे,दि.28 : दिवाळीच्या सुट्टीनिमित्त नागरिक मोठया प्रमाणावर  बाहेरगावी जात आहेत. या कालावधीत जिल्हयातील प्रमुख मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे तसेच सातारा रोडवर वाहतुक सुरळीत रहावी, लोकांना त्रास होणार नाही, यासाठी संबधित यंत्रणांनी सज्ज राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केले.
            येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात हायवे पोलीस, ग्रामीण पोलीस, राष्ट्रीय महामार्ग, रस्ते विकास महामंडळ,महसुल विभागाचे  अधिकारी यांच्या तातडीच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, दिवाळी सुट्टी कालावधीत बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांना वाहतुकीची कोंडी होवू नये याकडे विशेष लक्ष द्यावे. टोल नाक्यावर तीन मिनिटापेक्षा जास्त वेळ लागू नये लेन कटिंग होवू नये, मोठी वाहने ओव्हर टेक करु नये. वाहनाची गती प्रमाणापेक्षा जास्त राहू नये याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबधितांना देण्यात आल्या आहेत. तसेच हायवे पोलीसांना या कालावधीत आवश्यक उपायोजना करण्यासाठी वाहने उपलब्ध करुन दिले जाणार असल्याचे सांगितले.
   सातारा रोडवर रस्त्याच्या लगत अतिक्रमण करुन विविध पदार्थाची विक्री केली जाते. यामुळेही अपघात होवू शकतो. वळण रस्त्यावर निकषाप्रमाणे सूचना फलक असले पाहिजे. त्याचप्रमाणे निकषाप्रमाणे योग्य ठिकाणी  कठडे आहेत की नाही  याची खात्री करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी  सौरभ राव यांनी दिल्या.
            याप्रसंगी  जिल्हाधिकारी यांनी  संबधित विभागाकडून सध्या काय परिस्थिती आहे. वाहतुकीची कोंडी व अपघात टाळणेसाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत. आदिबाबत सविस्तर माहिती  घेतली. तसेच वाहतुकी  संदर्भात  विविध समस्या व अडचणी जाणून घेतल्या. यानुसार रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग, आयआरबी, आदि संबधित विभागांना आवश्यक कार्यवाही  करण्याबाबत कळविले जाणार असल्याचे सांगितले.
            तसेच दिवाळीच्या सुट्टीनंतर कायमस्वरुपी उपययोजनाची कालबध्द कार्यवाही करुन भविष्यात अपघात टाळण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले.
0000000

No comments:

Post a Comment