Friday, October 21, 2016

यशवंत भंडारे यांची लातूर उपसंचालकपदी नियुक्ती


विभागीय माहिती कार्यालयातर्फे सत्कार व निरोप

पुणे. दि. 21 (विमाका): पुणे विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक यशवंत भंडारे यांची नुकतीच लातूर येथे उपसंचालक (माहिती) पदी नियुक्ती झाली आहे. श्री. भंडारे यांच्याकडे या पदाबरोबरच मराठवाडा विभागाच्या संचालक (माहिती) पदाचा अतिरिक्त कार्यभारही सोपवण्यात आला आहे. याबद्दल पुणे विभागीय माहिती कार्यालयाच्यावतीने सहायक संचालक (माहिती) वृषाली पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करुन निरोप देण्यात आला. यावेळी पुणे विभागीय माहिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
          श्री. भंडारे यांच्या पदोन्नतीबाबत अभिनंदन करुन श्रीमती पाटील म्हणाल्या, सहकाऱ्यांवर विश्वास ठेवून काम यशस्वीपणे पार पाडण्याची कला त्यांच्या अंगी असल्यामुळे विभागात ते अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहेत. उत्कृष्ट जनसंपर्क आणि माणसं जोडणाऱ्या स्वभावामुळे ते सर्वपरिचित आहेत. विविध विभागाचे शासकीय अधिकारी व पत्रकारांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत.  प्रशासकीय कारणास्तव झालेली बदली ते नवीन संधी म्हणून स्विीकारून आपल्या कामाचा ठसा मराठवाडा विभागात उमटवतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
          सत्काराला उत्तर देताना, श्री. भंडारे म्हणाले, पुणे विभागात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियोजनबद्ध कार्यपध्दती आणि कामाप्रती निष्ठा असल्यामुळे पुणे विभागाचा राज्यात ठसा उमटला आहे. विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत काम करताना मिळालेल्या अनुभवांची शिदोरी मला नेहमी उपयोगी पडेल. शासनाच्या सेवेत काम करताना केवळ अधिकारी म्हणून न वावरता कुटुंबप्रमुख म्हणून कर्मचाऱ्यांच्या अडी-अडचणीही जाणून घेणे गरजेचे असते. कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवून खेळीमेळीच्या वातावरणात काम करण्याची मुभा दिल्यास दर्जेदार काम होते.
          श्री. भंडारे यांनी यापुर्वी लातूर, जालना, औरंगाबाद येथे जिल्हा माहिती अधिकारी या पदावर तसेच मंत्रालय, मुंबई व औरंगाबाद येथे सहायक संचालक म्हणूनही काम पाहिले आहे. शासकीय सेवेत येण्यापूर्वी त्यांनी दै. एकमतमध्ये निवासी संपादक म्हणून, दै. विश्वमित्रमध्ये वृत्तसंपादक पदावर तर दै. सकाळ व दै. लोकमतमध्ये उपसंपादकपदाची धुरा सांभाळली आहे. धुळे येथील विद्यावर्धिनी महाविद्यालयात वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन विभागाचे विभागप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
          सत्कार समारंभामध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. माहिती सहायक सचिन गाढवे यांनी आभार मानले.

0000000

No comments:

Post a Comment