Friday, October 21, 2016

शूरा मी वंदिले . . .! पालकमंत्र्यांनी वाहिली वीरमरण प्राप्त पोलिसांना आदरांजली


 पुणे, दि.२१ : आपले कर्तव्य बजावत असताना वीर मरण प्राप्त झालेल्या पोलिस दलातील शहीदांना पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज आदरांजली वाहिली.
            पोलिस स्मृतिदिनानिमित्त पोलिस आयुक्तालयाच्या वतीने पाषाण येथील पोलिस संशोधन केंद्राच्या प्रांगणात पालकमंत्री गिरीश बापट यांनी पोलिस स्मृतिस्तंभास पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. दि. सप्टेंबर २०१५ ते ३१ ऑगस्ट २०१६ याकालावधीत देशातील सर्व राज्यातील पोलिसदलातील एकुण ४७३ पोलिस अधिकारी कर्मचारी यांना कर्तव्य बजावत असताना वीर मरण प्राप्त झाले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पोलिस हवालदार नानजी बारकू  नागोसे, विलास विठोबा शिंदे, नितीन श्रीधर परब, पोलिस शिपाई बंडू धिसू वाचानी दिपक मुकुंद सदमके या पाच पोलिस जवानांचा समावेश आहे.
            यावेळी पोलिसदलातर्फे प्रारंभी शोकशस्त्र करुन वीरगती प्राप्त पोलिस अधिकारी शिपायांची नावे वाचण्यात आली. जनरल सॅल्युट झाल्यानंतर हवेत बंदूकीच्या तीन फैरी झाडून पोलिस दलाच्या वतीने मानवंदना दिली गेली. पोलिस बँडच्या पथकाने लास्ट पोस्ट ही धून बिगूलवर वाजवली.
लडाख येथील हॉटस्प्रिंग या कडाक्याच्या थंडीच्या भागात गस्त घालणाऱ्या केंद्रिय राखीव पोलिस दलाच्या १० शिपायांना चिनी सैनिकांच्या हल्लयात निकराची लढत देताना २१ ऑक्टोबर १९५९  या दिवशी वीरमरण प्राप्त झाले तेंव्हापासून दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस देशातील पोलिस दलाच्या वतीने पोलिस स्मृतिदिन म्हणून पाळला जातो.
स्मृतिदिनाच्या कार्यक्रमास पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, अप्पर पोलिस आयुक्त सुनील रामानंद, पोलिस अधिकारी, कर्मचारी नागरिक उपस्थित होते. परेडचे संचलन सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी केले.

००००


No comments:

Post a Comment