Friday, October 7, 2016

जलयुक्त शिवार अभियानाची प्रसिध्दी करणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार 30 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज आमंत्रित



पुणे, दि. 7  (विमाका) : जलयुक्त शिवार अभियानात वृत्तपत्रातून तसेच इलेक्ट्रानिक्स माध्यमाद्वारे जलसंधारणाचे महत्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणाऱ्या वृत्तपत्र प्रतिनिधींना शासनातर्फे पुरस्कृत करण्यात येणार आहे. या संबंधिचा शासन निर्णय ग्रामविकास व जलसंधारण विभागाने 28 सप्टेंबर 2016 रोजी निर्गमित केला असून जलयुक्त शिवार अभियानाची त्या-त्या परिसरातील जनजागृती, अभियानात लोकसहभाग वाढविणे, पाण्याचा ताळेबंद व कार्यक्षम वापर, पाणलोटाच्या यशोगाथा प्रकाशित करणे, इतर गावांना प्रोत्साहित करुन पाणी प्रश्न सोडविण्यात योगदान देणाऱ्या पत्रकारांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. वृत्तपत्र प्रतिनिधींनी विहित नमुन्यातील अर्जासह आपली प्रवेशिका तीन प्रतीत 30 ऑक्टोंबर पूर्वी सादर करावयाची आहे.
              जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रसिध्दीसाठी बातमीदारांनी मोहिमेच्या अंमलबजावणीच्या प्रथम वर्षी 1 जानेवारी 2015 ते 31 डिसेंबर 2015 आणि त्यापुढे प्रतीवर्षी 1 जानेवारी ते पुढील वर्षातील 31 डिसेंबर या कालावधीत प्रसिध्द केलेले साहित्य पुरस्कार पात्रतेकरीता मुल्यमापनार्थ ग्राहय धरण्यात येईल. या कालावधीत वृत्तपत्र व नियतकालिके यामधून प्रसिध्द झालेले टिकात्मक लेख, वृत्तांकन, बातम्या, अग्रलेख व फोटोफिचर  अशा साहित्याचा विचार करण्यात येईल.
         वृत्तपत्र बातमीदारांसाठी राज्यस्तर, विभागस्तर व जिल्हास्तर अशा तीन प्रकारात पुरस्कार देण्यात येतील. जिल्हास्तर प्रथम 15 हजार, द्वितीय 12 हजार, तृतिय 10 हजार, विभागस्तर प्रथम 30 हजार द्वितीय, 20 हजार, तृतिय 15 हजार आणि राज्यस्तर प्रथम 50 हजार, द्वितीय 35 हजार व तृतिय 25 हजार असे पुरस्काराचे स्वरुप आहे. तर इलेक्ट्रॉनिक्स मिडीयासाठी राज्यस्तरावरुन पुरस्कार देण्यात येईल. यात प्रथम 1 लाख रुपये, द्वितीय 71 हजार व तृतिय 51 हजार अशी रक्कम आहे. एका वर्तमानपत्राच्या प्रत्येक आवृत्तीच्या एकाच पत्रकाराचा अर्ज संपादकामार्फत स्विकारण्यात येईल. जिल्हास्तरीय पारितोषिकासाठी संबंधित जिल्हयातून प्रसिध्द होणारे वृत्तपत्र व नियतकालीके यामधून प्रसिध्द झालेले साहित्य विचारात घेण्यात येईल. पुरस्कारासाठी मागील 5 वर्षाची कामगिरी, सामाजिक बांधिलकी व शासनाच्या विकास विषयक जाणीवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जाईल. सलग दोन वर्ष एकाच पत्रकारास पुरस्कारास प्राप्त झाल्या तिसऱ्यास वर्षी त्यांची प्रवेशिका स्विकारली जाणार नाही. 
             स्पर्धेत भाग घेणाऱ्या पत्रकार स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे. प्रवेशिकेसोबत कोणाचेही शिफारसपत्र जोडण्याची आवश्यकता नाही. पुरस्कारासाठी पाठवायच्या प्रवेशिकेसोबत मुळ लिखाणाची कात्रणे त्यांच्या दोन प्रतीसोबत पाठवावी लागतील. स्पर्धेसाठी पाठविलेली प्रवेशिका त्यासोबत जोडलेली लेखांची कात्रणे निटनेटकी असणे आवश्यक राहील. अस्ताव्यस्थ, खाडाखोड असणारी किंवा वाचता येणार नाही, अशा प्रवेशिका रद्द समजण्यात येतील. प्रत्येक स्तरावरील पुरस्कारासाठी एकापेक्षा अधिक प्रवेशिका पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही. तरी वृत्तपत्र प्रतिनिधींनी 1 जानेवारी 2015 ते 31 डिसेंबर 2015 या कालावधीतील प्रसिध्द झालेल्या बातमीच्या कात्रणासह आपल्या प्रवेशिका 30 ऑक्टोंबर 2016 पूर्वी पोहचतील याबेताने जिल्हा माहिती कार्यालय, पुणे, सातारा व सोलापूर येथे पाठवाव्यात. त्यानंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 
                                                                   00000




No comments:

Post a Comment