Tuesday, October 25, 2016

आचारसंहितेचे काटेकोर पालन करा जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांच्या सूचना


सोलापूर दि. 25 :-  जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांच्या निवडणूकांत आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी आज येथे दिले.
            जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांच्या अध्यक्षतेखाली आज निवडणूक संनियंत्रण समितीची बैठक झाली. या बैठकीस सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. . एन. मालदार, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभु, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ आदी उपस्थित होते.
            जिल्हाधिकार रणजीतकुमार यांनी सांगितले की, जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांच्या निवडणूका आहेत. या निवडणूका निर्भय वातावरणात झाल्या पाहिजेत. त्याचबरोबर आदर्श आचारसंहितेचे कोठेही उल्लंघन होणार नाही, याची काळजी संबंधित यंत्रणेने घ्यावयाची आहे.
            बँकातील  मोठ्या आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवण्यात यावे. तशा सूचना अग्रणी बँक व्यवस्थापकांनी सर्व बँक व्यवस्थापकांना द्याव्यात. असे व्यवहार आढळल्यास  त्याची शहानिशा करावी तसेच निवडणूक शाखेला त्याची माहिती द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी रणजीकुमार यांनी अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक श्रीनिवास पत्की यांना दिल्या.
            निवडणूकांच्या कालावधीत कायदा आणि सुव्यवस्था राखली जाण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाव्यात. जेथे गरज आहे तेथे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक एस. वीरेश  प्रभू यांना दिल्या.
            शासकीय विश्रामगृह दिले जाताना सर्व पक्षांना समप्रमाणात वितरण कले जावे. शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात निवडणूक विषयक प्रचार बैठक अथवा मेळावा घेतला जाऊ नये अशा आशयाच्या सूचना दिल्या जाव्यात, असे जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. . मोरे यांना दिल्या. जिल्ह्यातील सर्व संबंधित विश्रामगृहात तशा आशयाच्या सूचना देण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी दिले.
                जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांच्या निवडणूकीसाठी जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांची मुख्य निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. म्हाडा पुणे चे मुख्याधिकारी अशोक काकडे आणि अन्नधान्य वितरण अधिकारी शहाजी पवार सह निरीक्षक असतील अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांनी दिली.
               बैठकीस नगर प्रशासन अधिकारी त्र्यंबक ढेंगळे- पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक आर. आर. कोले, महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता एस. . कोळी, अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीनिवास पत्की, पोलीस निरीक्षक आय. डी. ओमासे  उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment