Saturday, September 17, 2016

पुढील 48 तासात अतिवृष्टीचा इशारा कोयना नदी काठच्या गावांनी सतर्क रहावे- जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल


सातारा, दि. 17 (जिमाका) : हवामान खात्याने पुढील 48 तासात कोकण व मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. सध्या कोयना धरण शंभर टक्के भरले असून 25 हजार 765 क्युसेक्स पाणी कोयना नदी पात्रात सोडण्यात येत आहे. तरी नदी काठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल यांनी केले आहे.
कोयना धरणाचे वक्र दरवाजे अडीच फुटांनी उघडून 25 हजार 765 क्युसेक्स पाणी कोयना नदी पात्रात सोडण्यात येत आहे. नागरिकांनी नदी काठी जावू नये. तसेच पुलावरुन, ओढ्यांवरुन पाणी वाहत असल्यास अशा पुलांवरुन वाहतूक करु नये. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत कोयना व कृष्णा नदी काठच्या नागरिकांना, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, तरुण मंडळे यांना एसएमएसद्वारेही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच सर्व विभाग प्रमुखांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल यांनी कळविले आहे.
00000


No comments:

Post a Comment