मुंबई, दि. 1 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उद्या दि. 2 ऑक्टोबर 2016रोजी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विजेत्या छायाचित्रकारांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार असून, यानिमित्त आयोजिलेल्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
हा समारंभ 2 ऑक्टोबरला पु.ल.देशपांडे कला अकादमी, प्रभादेवी, दादर, मुंबई येथे दुपारी 1.30 वाजता होणार आहे.
महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र दर्शन घडावे यासाठी महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या विविध महत्वाच्या योजनांवर आधारित छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळाला. सुमारे3,800 छायाचित्रे प्राप्त झाली. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देवदत्त कशाळीकर (पुणे) यांना, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक विद्याधर राणे (मुंबई) तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिनेश भडसाळे (मुंबई) यांना जाहीर झाले आहे.
या पारितोषिकांचे स्वरूप अनुक्रमे 15 हजार रूपये, 10 हजार रूपये व 5 हजार रूपये व प्रमाणपत्र असे आहे. यावेळी 1 हजार रूपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षीसेही देण्यात येणार असून त्यासाठी सचिन मोहिते (नांदेड), अशोक पाटील (धुळे), चंद्रकांत पाटील (अकोला), शरद पाटील (कोल्हापूर) तर सतीश काळे (नाशिक) यांची निवड झाली आहे.
प्राप्त दर्जेदार छायाचित्रांची व पारितोषिक विजेत्यांची निवड ज्येष्ठ छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे, गॅझेटर्स विभागाचे कार्यकारी संपादक डॉ. दिलीप बलसेकर,पीआयबीचे मुख्य फोटो अधिकारी अख्तर सईद, माध्यम तज्ज्ञ आशुतोष पाटील आदी मान्यवरांच्या समितीने केली आहे.
दि.2 ते 5 ऑक्टोबर 2016 या कालावधीत पु.ल.देशपांडे कला अकादमी येथील कला दालनात पुरस्कार प्राप्त तसेच इतर निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
०००
No comments:
Post a Comment