विभागातील सर्व धरणांत ८०
टक्के पाणीसाठा
पुणे, दि. 8 (विमाका): पुणे विभागात सर्वदूर पुरेसा पाऊस
न झाल्याने १०३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तथापि, विभागातील सर्व
धरणांमध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला असून यावर्षी आत्तापर्यंत पडलेला
पाऊस समाधानकारक आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम् यांनी आज येथे
पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांत
गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. आजपर्यंत सर्व जिल्ह्यांतील
धरणांमध्ये सुमारे ८० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला असून. एक-दोन छोटे धरणं
त्यास अपवाद आहेत. धरणांतील जुलै-ऑगस्ट मधील पाणीसाठा लक्षात घेऊन धरणांमधील
पाण्याचा विसर्ग करण्याचे नियोजन करण्यात येते. त्यानुसार पुणे विभागातील धरणांतील
पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून, आतापर्यंत एकाही धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे
आपत्तीकालीन परिस्थिती निर्माण झालेली नाही. सध्या धोक्याचा इशारावजा सूचना
देण्यापर्यंत धरणांतील पाणी सोडण्याची परिस्थिती आहे. पडणारा पाऊस आणि धरणात
साठणारे पाणी याचे योग्य नियोजन होत असल्याने विभागात आपत्तकालीन परिस्थिती
निर्माण झाली नसल्याचे यावेळी आयुक्तांनी स्पष्ट केले. तथापि, उजनी धरणामध्ये आज
अधिक वीस टक्के पाणीसाठा झाला असून हा पाणीसाठा ११.२० टीएमसी एवढा आहे.
गेल्यावर्षी आज रोजीपर्यंत उणे साडेसात टक्के पाणीसाठा उजनी धरणात होता, असेही ते
म्हणाले.
विभागातील चार जिल्ह्यांमध्ये १०३
टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरु आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात ३५,
सातारा ६, सांगली ६० तर सोलापूर जिल्ह्यात २ टँकर सुरु आहेत. सर्वाधिक टँकर
बारामती २०, जत २१, आटपाटी १४ असे टँकर सुरु आहेत. ऑगस्टनंतर टँकर सुरु करावयाचे
असल्यास त्या-त्या गावांची विशेष तपासणी करून जिल्हाधिकारी आहवाल सादर करतात.
त्यांनतर तेथील टँकर सुरु ठेवायचे की नाही याचा निर्णय घेतला जातो. सध्या विभागात
पडत असलेला पाऊस लक्षात घेता या टँकरबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर निर्णय
घेतला जाईल. तथापि, या जिल्ह्यांमधील काही ठिकाणी योग्य स्वरूपात पाऊस पडत
नसल्याने हे टँकर सुरु असून त्या तालुक्यात परतीचा पाऊस होत असतो, असेही ते
म्हणाले.
****
No comments:
Post a Comment