Wednesday, August 10, 2016

रोल मॉडेल चांदक-गुळुंब ओढा जोडनं आणलं ओव्हर फूल्ल पाणी..!




   
वाई मधील चांदक-गुळुंब हा ओढा जोड प्रकल्प देशातील आगळा वेगळा रोल मॉडेल ठरला आहे. सध्या झालेल्या पावसाने या ओढा जोडनं गुळुंबचा पाझर तलाव ओव्हर फूल्ल झालेला आहे. हा तलाव भरुन सध्या वाहतोय. या ओढा जोड प्रकल्पाने  गुळुंब ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील पाण्याच्या चिंतेच्या जागी  आनंद फुलविला आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे अध्यक्ष एस. रामादुराई यांनी मे 2015 मध्ये चांदक- गुळुंब ओढा जोड प्रकल्पाला अचानक भेट देऊन प्रशासनाच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली होती. या प्रकल्पाची माहिती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
काय आहे  चांदक-गुळुंब ओढा जोड प्रकल्प ?
              *  चांदक येथील ओढा पावसाळ्यामध्ये पूर्ण क्षमतेने भरुन वाहतो . या ओढ्यावर  चार ठिकाणी  बांध आहेत की जे पूर्ण  
         क्षमतेने भरुन वाहतात
         * या उलट गुळुंबमध्ये पडणाऱ्या कमी पावसामुळे पाणी टंचाई भासते.
              * दरवर्षी जिल्हा प्रशासनातर्फे गुळुंब परिसरातील 14 गावांमध्ये पाण्यासाठी टँकर द्यावा लागतो
              * जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी भेट देऊन हा प्रकल्प हाती घेतला.
              * चांदक ते गुळुंब पाझर तलाव हे अंतर 1130 मीटर इतके आहे. या दरम्यान 500 मि. मि. व्यासाची पाईपलाईन टाकली आहे.
              * गुळुंब येथील पाझर तलावाची क्षमता 497 टीसीएम इतकी आहे.
              * या प्रकल्पासाठी जमा निधी - मॅप्रो कंपनीतर्फे 20 लाख, ज्ञानदीप सहकारी  पतसंस्थेकडून 20 लाख, आमदार मकरंद पाटील यांच्या
                फंडातून  15 लाख, गुळुंब ग्रामस्थांकडून 5 लाख, किसनवीर सहकारी साखर कारखान्याकडून उत्खननासाठी 25 लाख असा
        एकूण 85 लाख
              * गुळूंबची लोकसंख्या 2 हजार 500
              * पाझर तलावांखाली असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या 3 तसेच कृषी क्षेत्रासाठी 28 विहिरींना फायदा होणार आहे.
              * या ओढा जोड प्रकल्पामुळे 1 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली
              * 10 लाख 80 हजार वार्षिक टँकरवर होणारा खर्च पूर्णपणे थांबणार. चांदक आणि गुळुंब या दोन्ही गावातील 5 हजार लोकांच्या  
        पाण्याचा प्रश्न निकालात.
सध्या गुळुंबचा पाझर तलाव ओव्हर फूल्ल झाला आहे. या विषयी दिलेल्या काही निवड प्रतिक्रीया.
              रवींद्र खेबुडकर (तत्कालीन प्रांताधिकारी) : गुळुंब ग्रामस्थांना या प्रकल्पाच्या माध्यमातून आता पाणी मिळणार आहे. हेच खूप मोठे माझ्यासाठी समाधान आहे. यामध्ये सर्वांचे योगदान आहे.
              अल्पना यादव (तत्कालीन सरपंच) : सर्व अधिकारी, ग्रामस्थ या सर्वांनी हा प्रकल्प मेहनतीने पूर्ण केला आहे. गावाला नेहमी टँकर लागायचा. आता तो लागणार नाही. झालेल्या पाण्याचा प्रत्येक थेंबाचा आम्ही काटकसरीने वापर करु.
              दीपा बापट (गट विकास अधिकारी) :  वर्षापूर्वी पूर्ण झालेल्या प्रकल्पाचे यश आज पाहताना खूप आनंद होत आहे. अधिकारी, ग्रामस्थ एकत्र आल्यानंतर काय घडू शकतं हे दाखविणारा हा प्रकल्प आहे.
              अतुल म्हेत्रे (तहसीलदार) : जिल्हाधिकारी, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, तत्कालीन प्रांताधिकारी आणि तत्कालीन तहसीलदार या सर्वांनी या प्रकल्पासाठी खूप मेहनत घेतली आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. गावचा पाणी प्रश्न निकालात निघाला आहे.
              राजकुमार साठे (उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग) : चांदक तलावामधून वाया जाणारे पाणी गुळुंबच्या तलावात आणून सोडले. सध्या तलाव भरला असून सांडव्यावरुन पाणी वाहत जात आहे. यामुळे निश्चितच परिसरातील शेतीसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी फायदा होणार आहे आणि उत्पन्नातही वाढ होणार आहे.
              फतेसिंग संकपाळ (शेतकरी): गावचा पाण्याचा प्रश्न आता मिटणार आहे.
              विष्णू यादव (शेतकरी) : संपूर्ण जमीन भिजून चांगले उत्पन्न मिळणार आहे.
             मनीषा यादव (ग्रामस्थ) : दोन-तीन वर्ष पाऊस नव्हता. सध्या झालेल्या पावसामुळे तलाव भरला आहे. पुढील दोन-तीन
                                                  वर्षाची चिंता मिटलेली आहे.
              सध्या ओसंडून वाहणारा गुळुंबचा तलाव आणि त्याहीपेक्षा ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहणारा आनंद हे जलयुक्त शिवार अभियानाचे यश आहे. चांदक-गुळुंब ओढा जोड प्रकल्पानं पाण्याबरोबरच ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर हा आनंद ओव्हर फूल्ल केला आहे. हेच या प्रकल्पाचे रोल मॉडेल म्हणावे लागेल.
      - प्रशांत सातपुते
                                                                                                 जिल्हा माहिती अधिकारी, सातारा

00000

No comments:

Post a Comment