सातारा, दि.9 (जिमाका) : खंडाळा पंचायत समितीच्या माध्यमातून
गरुडझेप सावित्रीच्या खंडाळ्याची हा शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहे. ही खंडाळ्यातून
झालेली शैक्षणिक क्रांतिकारी वाटचाल आहे. हा उपक्रम यशस्वी झाल्यास राज्यभर हे
धोरण राबविण्यात येईल, असे आश्वासन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर
यांनी दिले.
पंचायत समिती खंडाळा शिक्षण विभागाच्यावतीने
गरुड झेप सावित्रीच्या खंडाळ्याची या शैक्षणिक उपक्रमाचा शुभारंभ विधान परिषदेचे
सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते आज करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख
पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मकरंद पाटील हे
होते. यावेळी आमदार प्रभाकर घार्गे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी.
पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, बाल भारतीचे संचालक सुनील मगर,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दिनकर पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल)
भारत वाघमारे, शिक्षण सभापती सतीश चव्हाण, प्रांताधिकारी अस्मिता मोरे, गटविकास
अधिकारी दिपा बापट, उपसभापती सारीका माने, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष
पाटणे, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात
क्रांतिस्तंभ, यशवंतराव चव्हाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
पुतळ्यांना पुष्पहार घालून तसेच मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन
दिपप्रज्वलनाने करण्यात आली.
खंडाळा पंचायत समितीचे सभापती नितीन
भरगुडे-पाटील यांनी यावेळी प्रास्ताविक केले. ते यावेळी म्हणाले, हा उपक्रम
राबविताना पंचायत समितीच्या सर्व शिक्षकांची बैठक घेवून त्यांच्या सूचना घेण्यात
आल्या. या उपक्रमांतर्गत सगळ्या शाळा संगणकीकृत करण्यात येणार आहेत. विद्यार्थी,
शिक्षक एक दिवस इंग्रजीत बोलणार आहेत. शाळेचा शनिवार हा विना दप्तराचा असेल. या
दिवशी पर्यावरणविषयक, परिसरविषयक आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे शिक्षण
दिले जाईल. शाळेमध्ये दररोज एक परिपाठ असेल. त्याचबरोबर शिक्षक, विद्यार्थी
यांच्यासाठी गणवेश निश्चित केला आहे. आजपासून प्रत्येकजण ओळखपत्राचा वापर करेल.
इंग्रजी आणि गणित यावर विशेष भर देण्यात आलेला आहे. नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात
येणार असल्याचे यावेळी सांगितले.
विधान परिषदेचे सभापती बोलताना पुढे म्हणाले,
संस्कारक्षम वय आणि त्याच्यावर होणारे
संस्कार तुमच्या हातात आहे. याची जाणीव प्रत्येक शिक्षकाने ठेवली पाहिजे. पुढच्या
पिढीसमोर भरपूर आव्हाने आहेत. ही आव्हाने पेलन्याची खरी ताकद त्यांना द्या. आरोग्य आणि शिक्षण या दोन क्षेत्रात आपला
ग्रामीण भाग मागे पडत आहे. खरे आव्हान स्वीकारायचे असेल तर या दोन क्षेत्रात
स्वीकारा. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या खंडाळा तालुक्यात या उपक्रमाची
सुरुवात होत आहे. ही खरी शैक्षणिक क्रांतिकारी वाटचाल आहे. हा उपक्रम यशस्वी
झाल्यास राज्यभर धोरणच राबवू, असे आश्वासनही त्यांनी शेवटी दिले.
अध्यक्षीय भाषणात आमदार मकरंद पाटील म्हणाले, या
कार्यक्रमाचे स्वरुप पाहून मला अतिशय आनंद होतोय. क्रांतिदिनाच्या निमित्ताने
शिक्षण क्षेत्रातील क्रांतिकारी पाऊल या निमित्ताने तुम्ही टाकले आहे. शैक्षणिक क्षेत्रात
निश्चितपणे आगळी वेगळी क्रांति करणारा उपक्रम आहे. याचा मला अभिमान आहे, असेही
त्यांनी शेवटी सांगितले.
यावेळी आमदार प्रभाकर घार्गे, शिक्षण सभापती
सतीश चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते योजनेची
संपूर्ण माहिती देणाऱ्या गरुड झेप सावित्रीच्या खंडाळ्याची या मार्गदर्शक
पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. वंदे मातरम गावून कार्यक्रमाची सांगता
करण्यात आली. कार्यक्रमाला खंडाळा तालुक्यातील शिक्षक, शिक्षीका, सरपंच, उपसरपंच,
अधिकारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment