Thursday, August 11, 2016

आमदार आदर्श ग्राम योजनेतील गावांमध्ये ग्रामदिनाची संकल्पना राबवा .. जिल्हाधिकारी सौरभ राव






खारावडे, ता.मुळशी गावाला आमदार विजय काळे जिल्हाधिकारी सौरभ राव यांची भेट

      पुणे, दि. 11 –  एका गावातील गावकऱ्यांनी दुसऱ्या गावांमध्ये जाऊन तेथील विकास कामाची पाहणी करण्याबरोबरच आमदार आदर्श ग्राम योजनेतील गावांमध्ये ग्रामदिनाची संकल्पना राबवावी अशी सूचना जिल्हाधिकारी सौरभ यांनी केली. आमदार विजय काळे यांनी दत्तक घेतलेल्या खारावडे ता.मुळशी येथे मंजूर करण्यात आलेल्या आलेल्या विविध विकास कामांची पाहणी ग्रामस्थांनी प्रस्तावित केलेल्या विकास कामांवर निर्णय घेण्यासाठी आमदार विजय काळे यांच्या पुढाकाराने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते.
      यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आमदार विजय काळे यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. खारावडे गावातील म्हसोबा देवस्थान वर्ग तिर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या देवस्थानाच्या विकास कामांची पाहणी यावेळी जिल्हाधिकारी यांनी आमदार विजय काळे यांच्या समवेत केली. गावकऱ्यांनी गांवच्या विकासासाठी सकारात्मक भावनेने कार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी यावेळी गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना केले. ग्राम दिनाच्या निमित्ताने गावकऱ्यांनी लहान मुलांसाठी विविध स्पर्धा, योग शिबीर, व्यसनमुक्ती शिबीर, तंटा मुक्ती शिबीर, डास मुक्ती अभियान, कृषि पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, गावकऱ्यांचे समूह जेवण आयोजित करण्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी केली.
      गांवाच्या विकासामध्ये तरुणांचा सहभाग महत्वाचा असल्याने गावांतील तरुणांनी आमदार आदर्श ग्राम योजनेतील विकास कामे पूर्ण होण्यासाठी आपला सहभाग द्यावा असे आवाहन आमदार विजय काळे यांनी यावेळी केले. तरुणांसाठी व्यायाम शाळा बांधून देण्याचे नियोजन करण्याची सूचना यावेळी त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना केली. केली. गांवच्या विकास कामांसाठी पूरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे आमदार विजय काळे यांनी सांगितले.
      यावेळी झालेल्या चर्चेमध्ये गांवातील रस्त्यांची दुरुस्ती करणे, गांवात इंटरनेट कनेक्टिव्हीटी उपलब्ध करुन देणे, घरांची नोंदणी, तलाठी कार्यालयाची स्थापना, पाणी पुरवठा, एस.टी.बस सेवा आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याची मागणी गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. यावेळी पंचायत समिती सभापती महादेवअण्णा सोंढरे, प्राताधिकारी सुनिल थोरवे, उमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शालीनी कडू पाटील, तहसीलदार विशाल ढगे, देवस्थानच्या अध्यक्षा श्रीमती वृंदाताई भेलके, मधुरा भेलके, खारावडे गांवचे ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
000


No comments:

Post a Comment